अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदीतील लाचखोरीच्या विषयावरून भारतीय जनता पक्षाचे नेते केंद्र सरकावर टीका करीत असताना, त्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते जसवंतसिंह यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या काळातच हेलिकॉप्टर खरेदी निविदेतील नियमांमध्ये बदल करण्यात आल्याचा खुलासा गुरुवारी केला.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱया जसवंतसिंह यांनी यासंपूर्ण प्रकारात इटलीती कंपनीच दोषी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांच्यावर सरसकट आरोप करू नयेत. ते देशाच्या आणि हवाईदलाच्या हिताचे नाही. सखोल चौकशी सुरू आहे. स्वतः त्यागी यांनीही लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आपण त्यांच्या मताशी सहमती दर्शविली पाहिजे. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही, तोपर्यंत परस्परांवर आरोप करू नयेत.
भाजपने हेलिकॉप्टर खरेदीतील भ्रष्टाचारावरून पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीका केली आहे. त्यापार्श्वभूमीवर जसवंतसिंह यांच्या मताला महत्त्व प्राप्त झाले आहे.