बंगळूर-नांदेड एक्स्प्रेसला ट्रकची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात कर्नाटकच्या आमदारासह पाचजण ठार तर २० प्रवासी जखमी झाले आहेत. आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यात आज पहाटे हा अपघात झाला.
अनंतपूर जिल्ह्यातील मदाकिसरा येथील रेल्वे क्रॉसिंगवर बंगळूर-नांदेड एक्स्प्रेसला ग्रॅनाईट घेऊन जात असलेल्या ट्रकने धडक दिली. एक्स्प्रेसच्या एच-१ डब्याला ट्रकने जोरात धडक दिल्याने दोन बोग्या रुळावरून उतरल्या. या अपघातात कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार ए. ए. व्यंकटेश नाईक यांच्यासह अन्य पाच जणांचा मृत्यू झाला. नाईक हे कर्नाटकमधील रायचूर जिल्ह्यातील देवादुर्ग मतदारसंघाचे आमदार होते. ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे कळते. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी व बचाव पथकाच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेेतली असून जखमींवर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे बंगळूर-गुंटाकल मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.