तामिळनाडूसाठी १२ टीएमसी फूट पाणी सोडण्याची कावेरी निरीक्षण समितीने केलेली शिफारस कर्नाटकसाठी ती अतिशय हानिकारक असल्याचा आरोप करीत, कर्नाकटचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी ही शिफारस फेटाळून लावण्याची विनंती पंतप्रधान मनमोहन सिंग यांना केली आह़े  कर्नाटकमधील पिके वाचविण्यासाठी ही शिफारस फेटाळण्यात यावी, असे शट्टर यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आह़े
कावेरीच्या पाण्याचे ४०.४  टक्के नुकसान ग्राह्य धरूनही समितीने तामिळनाडूला डिसेंबर महिन्यात १२ टीएमसी फूट पाणी देण्याचे आदेश शुक्रवारी दिले आहेत़  या आदेशामुळे, करारानुसार करावयाच्या ६.१२ टीएमसी फूट पाणीपुरवठय़ापेक्षा दुप्पट पाणी तामिळनाडूसाठी सोडावे लागणार आहे, असेही शेट्टर यांनी पत्रात म्हटले आह़े  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कर्नाटक आधीपासूनच १० हजार क्युसेक पाणी तामिळनाडूला सोडत आह़े  त्यामुळे त्याहून अधिक पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यास कावेरी खोऱ्यातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजेल, असे शेट्टर यांचे म्हणणे आह़े