ऑगस्टावेस्टलॅंडकडून हेलिकाप्टर्स खरेदी करण्यासाठी लाचखोरीत मध्यस्थी करणारा स्वित्झर्लंडस्थित एका सल्लागाराने आपण माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांना सहा ते सात वेळा भेटल्याची कबुली दिली. 
इटलीतील तपासपथकाच्या अधिकाऱयांकडे कबुली देताना गुईडो हॅश्के याने सांगितले की, त्यागी यांच्याबरोबर मी करारातील तांत्रिक अटींबाबत चर्चा केली होती. मला कंपनीकडून दोन कोटी युरो कमिशन म्हणून मिळाले होते. त्यापैकी एक कोटी २० लाख युरो मी त्यागी यांचे दिल्लीतील नातेवाईक ज्युली त्यागी, डोक्सा त्यागी आणि संदीप त्यागी यांच्याकडे दिले होते.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तपास अधिकाऱयांनी हॅश्के यांचा जबाब रेकॉर्ड केला होता आणि मंगळवारी फिनमेकानिकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोजेफ ओर्सी यांना अटक करण्यासाठी सादर केलेल्या तपास अहवालासोबत तो जोडलादेखील होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यासाठी ऑगस्टावेस्टलॅंड कंपनीने तत्कालिन हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांना लाच दिल्याचे तपासातून स्पष्ट झाल्याचे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने सर्वप्रथम छापले होते. मात्र, त्यागी यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले असून, सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.