मुदतीत समाधानकारक व्यवसाय पुनर्बांधणी आराखडा सादर न करू शकलेल्या किंगफिशर एअरलाईन्सचा हवाई परवाना अखेर २०१२ च्या मावळतीलाच संपुष्टात आला. याचबरोबर किंगफिशरला सर्वाधिक कर्ज देणाऱ्या स्टेट बँकेने दिलेल्या मुदतीचीही अखेर झाली आहे.
२००५ मध्ये भारतीय खाजगी विमान वाहतूक क्षेत्रात शिरकाव करणाऱ्या किंगफिशरच्या हवाई परवान्याची ३१ डिसेंबर रोजी अखेरची मुदत होती. तत्पूर्वीच, कंपनीची उड्डाणे नागरी हवाई महासंचलनालयामार्फत स्थगित झाली होती. कंपनीने आठवडय़ापूर्वीच व्यवसाय पुनर्बांधणी आराखडा सादर केला होता. यानंतर दीडेक महिन्यात काही उड्डाणे सुरू करण्याचा कंपनीचा विश्वास होता; मात्र हा आराखडा समाधानकारक नसल्याचे केंद्रीय नागरी हवाई मंत्री अजितसिंह यांनी स्पष्ट केले होते.