दिल्ली विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडू न शकलेल्या काँग्रेसमधील वाद आता चव्हाटय़ावर आले आहेत. माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दारुण पराभवाला पक्षाचे दिल्लीतील प्रचारप्रमुख अजय माकन यांना जबाबदार धरले आहे. मात्र काँग्रेसचे दिल्ली प्रभारी पी.सी. चाको व प्रदेशाध्यक्ष अरविंद लवली यांनी माकन यांची बाजू घेतली आहे.
केवळ आपणच सगळे निभावून नेऊ, अशा थाटात माकन वावरले. प्रचाराच्या रणनीतीत त्यांनी कुणालाही सामील करून घेतले नाही. त्यांच्या या कार्यपद्धतीने काँग्रेसचा दारुण पराभव  झाल्याचे खापर दीक्षित यांनी माकन यांच्या माथी फोडले.
काँग्रेसमधून नाराजी
शीला दीक्षित यांच्या वक्तव्यावर पी.सी.चाको यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माकन यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी पक्षाच्या यशासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रशस्तिपत्रही चाको यांनी दिले.  शीला दीक्षित यांनी निवडणुकीपूर्वीच सूचना करायला हव्या होत्या, अशी अपेक्षा लवली यांनी व्यक्त केली.