आयपीएल गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यामार्फत सर्व काही ठीक करण्यासाठी भाजप खासदार वरुण गांधी यांनी ३७५ कोटी रुपयांची मागणी केल्याच्या ललित मोदी यांच्या आरोपानंतर भाजप व काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली. ललित मोदींवरून परस्परांना लक्ष्य करणाऱ्या उभय पक्षांचे नेते या आरोपानंतर स्वत:च घायाळ झाले. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कशीबशी बाजू सावरली खरी परंतु खुद्द वरुण गांधी यांनी ललित मोदी यांना भेटल्याचे वृत्त मान्य केल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. मात्र ललित मोदी व माझ्यात कोणतेही ‘डील’ झाले नव्हते, असे स्पष्टीकरण वरुण गांधी यांनी दिले आहे.
ललित मोदी यांनी ट्विटरवरून वरुण व सोनिया गांधी यांच्यावर शरसंधान केले होते. चौकशीचा ससेमिरा संपविण्यासाठी सोनिया गांधी यांच्याशी बोलण्याच्या अटीवर वरुण गांधी यांनी ३७५ कोटी रुपये मागितले होते, असा गौप्यस्फोट ललित मोदी यांनी केला. वरुण यांच्याशी लंडनमध्ये झालेल्या भेटीप्रसंगी खा. भरत सिंह उपस्थित होते, असा दावा मोदींनी केला होता. हे प्रकरण मिटविण्यासाठी इटलीस्थित सोनिया गांधी यांच्या बहिणीला भेटण्याचा सल्ला वरुण गांधी यांनी दिल्याचेही मोदी म्हणाले होते. त्यानंतर भाजप व काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
वरुण गांधी यांची पाठराखण करण्यासाठी दिल्लीस्थित एकाही भाजप नेत्याने प्रतिक्रिया दिली नाही. राजस्थानमधील स्थानिक नेते रामेश्वर चौरसिया यांनी कशीबशी सारवासारव केली. वरुण व मेनका गांधी यांचे सोनिया यांच्याशी असलेले संबंध जगजाहीर आहेत. त्यामुळे मोदी एकापाठोपाठ खोटे बोलत आहेत. त्यात ते स्वत: अडकत असल्याचा बचाव चौरसिया यांनी केला. काँग्रेसने मात्र आक्रमकपणे भाजपवर हल्ला चढविला. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला म्हणाले की, सोनिया गांधी यांनी ललित मोदी यांच्याशी कधीही संपर्क केलेला नाही. मोठे (पंतप्रधान नरेंद्र) मोदी छोटय़ा (ललित) मोदींचा बचाव करीत आहेत. त्यामुळे छोटे मोदी केंद्र सरकारच्या दबावाखाली खोटे आरोप करीत असल्याची टीका सुर्जेवाला यांनी केली.