दोन कार्डिनल्सच्या भ्रष्ट आचरणामुळे निर्माण झालेल्या वादाने झाकोळलेल्या वातावरणात पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी रविवारी आपल्या पोपपदाच्या कारकिर्दीतील अखेरची ‘रविवारची प्रार्थना’ केली. आपण पोपपदाचा त्याग करीत असलो, तरी चर्चला मात्र कदापि सोडणार नाही, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. ‘‘परमेश्वराने आपणांस शांततेने चिंतन-मनन करण्यास जीवन अर्पण करावे, असे सांगितले आहे,’’ असेही त्यांनी सेंट पीटर्स स्क्वेअर येथे झालेल्या या प्रार्थनेदरम्यान सांगितले.
येत्या गुरुवारी पोप बेनेडिक्ट आपल्या पदाचा औपचारिकरीत्या राजीनामा देणार आहेत. त्यानंतर नव्या पोपची निवड करण्यासाठी निवडसभा बोलाविण्यात येणार आहे. त्या सभेत दोन वादग्रस्त चर्च अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. त्यातील एका कार्डिनलवर बालकांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण दडपण्याचा, तर दुसऱ्यावर ‘अयोग्य कृती’ केल्याचा आरोप आहे. या वादामुळे इटलीमध्ये मोठे वादळ निर्माण झाले असून, तेथील प्रसारमाध्यमांनीही त्यावरून राळ उठविली आहे. असे असले तरी पोप बेनेडिक्ट यांच्या रविवारच्या प्रार्थनेसाठी हजारो चर्च-अनुयायी मोठय़ा उत्साहाने जमा झाले होते.
व्हॅटिकनमधील आपल्या निवासस्थानाच्या खिडकीतून चर्च-अनुयायांना संबोधित करताना पोप बेनेडिक्ट अक्षरश: भावविवश झाले होते.
ते म्हणाले, ‘‘परमेश्वर मला पर्वतारोहण कर, प्रार्थना आणि ध्यानधारणेत अधिक काळ व्यतीत कर, असे सांगत आहे. परमेश्वर मला असे करण्यास सांगत आहे, याचा अर्थ हाच आहे की मी पूर्वीच्याच, परंतु माझ्या वयास आणि सामर्थ्यांस अनुरूप अशा निष्ठेने आणि प्रेमाने सेवा करावी.’’ आपल्या भाषणाच्या अखेरीस सर्वाचे आभार मानत ते म्हणाले, ‘‘आपण नेहमीच एकमेकांजवळ असू.’’