अन्न सुरक्षा व घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमती यावर आवाज उठवण्यापेक्षा गोरगरिबांसाठी स्वच्छतागृहे तसेच त्यांच्या जीवनावश्यक गरजा या प्रश्नांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करा, असे आवाहन अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते लेखक अमर्त्य सेन यांनी डाव्या पक्षांना केले आहे. कोलकाता साहित्य परिषदेच्या एका सत्रात सेन यांनी ही विनंती डाव्या पक्षांना केली आहे. गेल्या वर्षी काही काळ अख्खा उत्तर भारत अंधारात असतानाचे वृत्त देशभरातील बहुतांश वर्तमानपत्रांनी प्रमुख मथळा म्हणून प्रसिद्ध केले. मात्र असे वृत्त देणाऱ्यांना देशातील एकतृतीयांश जनता ही सदैव अंधारातच राहते, याचे भान त्यांना उरले नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
डाव्यांना डोस?
‘आम आदमी’च्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून डावे पक्ष हे घरगुती वापराचा गॅस, विजेच्या वाढलेल्या दरांबाबत नेहमीच निषेधाचा सूर आळवताना दिसतात, तेव्हा आपण व्यथित होतो, असे सांगून ते पुढे म्हणाले की भारतात सुमारे ४८ टक्के लोक स्वच्छतागृहांशिवाय राहतात. अशा लोकांना उघडय़ावरच आपले प्रातर्विधी उरकावे लागतात व असा हा जटिल प्रश्न आजही दुर्लक्षितच आहे. चीनमध्ये हेच प्रमाण १ टक्का तर बांगलादेशात ९ ते १० असे आहे. नोबेल पुरस्कार विजेत्या अमर्त्य सेन यांनी अगोदर अनेक वेळा बाल कुपोषण आणि मलनिस्सारणाबाबतचे प्रश्न आपल्या व्याख्यानातून तीव्रतेने उपस्थित केले आहेत.
काही वेळा माझ्यावर डाव्या पक्षांना लक्ष्य केल्याचा आरोप केला जातो. मात्र ते जेव्हा अत्यंत गरीब लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून मध्यम वर्गाचा कळीचा मुद्दा असलेला गॅसच्या वाढलेल्या किमतीच्या वा तत्सम अन्य प्रश्नांवर रान उठवतात तेव्हा मला अस्वस्थ वाटते. मध्यमवर्गाच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तुम्ही लढत असता मग गोरगरिबांच्या प्रश्नांचे काय? असा प्रश्न मला पडून मी निराश होतो     – अमर्त्य सेन