संसदेवरील हल्ल्याबद्दल दोषी ठरलेला दहशतवादी अफझल गुरू याला झालेली फाशीची शिक्षा अमलात आणू नये, त्याऐवजी त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, असे मत केंद्रीय पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी गुरुवारी व्यक्त केले. या वक्तव्याने त्यांनी काँग्रेसला गोंधळात टाकले. मात्र तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे हे लक्षात येताच त्यांनी सारवासारव केली. असे वक्तव्य आपण केले नसून आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास बांधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने वर्मा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे टाळले. पक्षाचे प्रवक्ते सत्यव्रत चतुर्वेदी म्हणाले, ‘‘हे बेनी यांचे वैयक्तिक मत आहे. पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नाही. अफझल गुरूला फाशी देण्याबाबतच्या सरकारच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. अफझल गुरूच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हायलाच हवी.
संसदेवरील हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांशी लढत शहीद झालेल्या सुरक्षा दलाच्या जवानांना एकीकडे श्रद्धांजली वाहिली जात असतानाच दुसरीकडे वर्मा यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्ष, शिवसेनेसह इतर विरोधी पक्षांनी सडकून टीका केली