जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या भारतीय लोकशाहीमधील मर्यादा दूर करणे आवश्यक असल्याचे मत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मतदारांना नकाराधिकार (राइट टू रिजेक्ट) चा हक्क आणि विजयी उमेदवाराची निवड ही मताधिक्याऐवजी बहुमतावर होणे आवश्यक आहे, असे उपराष्ट्रपतींनी  सांगितले.
   मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या नागरिकांना मतदान केंद्राकडे आकर्षित करण्यासाठी      नकाराधिकाराचा हक्क हे एक महत्त्वाचे साधन ठरू शकते. जगातील काही लोकशाही राष्ट्रांतील मतदारांना हा हक्क देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
विद्यमान लोकसभेतील ८३ टक्के खासदार ५० टक्क्यांपेक्षा कमी मते घेऊन निवडून आले आहेत. बहुसंख्य मतदारांऐवजी मताधिक्याला महत्त्व देण्याच्या राजकीय व्यवस्थेमुळे सुरक्षित मतदारांचा समूह (व्होट बॅँक) तयार करण्याकडे बहुतेक उमेदवारांचा कल असतो, त्यामुळे मतदारसंघातील सामाजिक विषमता वाढीस लागत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले