लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज (शुक्रवार) दुस-या दिवशीही विरोधकांनी नोकरीतील बढतीमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना आरक्षण आणि किरकोळ व्यापारातील परकीय गुंतवणूक या मुद्यांवरून गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.
पंतप्रधानांनी गुरूवारी रात्री भाजपच्या जेष्ठ नेत्यांना मेजवानीसाठी निमंत्रम दिले होते. मात्र, या बैठकीत काहीच निर्णय होऊ शकला नाही. किरकोळ व्यापारातील परकीय गुंतवणूक या मुद्यावर आम्ही संसदेतच चर्चा करू असं भाजपतर्फे सांगण्यात आलं. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली या मेजवानीस उपस्थित होते.
तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांनी किरकोळ व्यापारातील परकीय गुंतवणूकीच्या मुद्यांवरून गोंधळ घातला आणि भाजप नेत्यांनी टूजीच्या परवान्याचे वाटप करताना कॅगवर दडपण आणले असा आरोप कॉंग्रेसच्या नेत्यांनी संसदेत केला. या सर्व गोंधळात आजचे कामकाज तहकूब करावे लागले.
उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवरून काल (गुरूवार) बहुजन समाज पक्षाने गदारोळ केला होता. लोकसभेमध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नव्या मंत्र्यांची ओळख करून दिली. पण मीराकुमार यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासाची घोषणा करताच विरोधी पक्षांनी कामकाजात अडथळे आणण्यास सुरवात केली.
राज्यसभेतही बहुजन समाजवादी पक्षाच्या नेत्या मायावती यांनी सरकारी नोक-यांमध्ये अनुसूचित जाती आणि असनुसूचित जमातींच्या लोकांना आरक्षण असावे याची मागणी केली.