गुन्ह्य़ांची उकल करण्यात जगात अग्रस्थानी असलेल्या स्कॉटलंड यार्डने आपल्या पोलिसांना तंदुरुस्त राहण्यासाठी वजन कमी करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा नोकरीतून काढण्याची धमकी दिल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे.
पोलिसांनी स्वत:ला तंदुरुस्त न ठेवल्यास व तंदुरुस्ती चाचणीत पास न झाल्यास स्कॉटलंड यार्डला त्यांची गरज नसल्याचे महानगर पोलीस आयुक्त सर बर्नार्ड होगन होवे यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला सांगितले. इंग्लंडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना वार्षिक तंदुरुस्ती चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. या चाचणी वेळखाऊपणाच्या असल्या तरी यामुळे पोलीस दलात जागरूकता निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.
एखादा अपघात घडल्यास वजन जास्त असलेला पोलीस त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत जखमी व्यक्तीने प्राण सोडलेले असतील. तसेच गुन्हेगाराने त्या पोलिसाच्या हातावर तुरी देत पळ काढलेला असेल. यामुळे असे पोलीस स्कॉटलंड यार्डसाठी काडीच्याही कामाच्या लायक नाहीत, असे सर बर्नार्ड यांनी सांगितले.