महात्मा गांधी आज असते तर त्यांनी  म्यानमारबाबत आजवर घेतलेल्या भू्मिकेबाबत नाराजी व्यक्त करून भारताला म्यानमारच्या पाठीशी उभे राहण्यास भाग पाडले असते, असे मत मांडून म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आँग सान सूची यांनी भारताच्या आपल्या देशाबाबत असलेल्या संदिग्ध धोरणांवर  गुरुवारी अप्रत्यक्षरीत्या टीका केली.  ‘ सीएनएन- आयबीएन’ वाहिनीवीरील प्रसिद्ध ‘डेव्हिल्स अॅडव्होकेट’ या कार्यक्रमामध्ये करण थापर यांच्याशी संवाद साधताना सूची यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महात्मा गांधी यांचा माझ्यावर सर्वाधिक प्रभाव होता. त्यांचे व्यक्तिमत्त्वच असे होते, की त्यांनी देशाला म्यानमारच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे सुचविले असते.  भारत आमच्या देशाशी सर्वात निकट असल्याचे मी मानते मात्र त्याच्या संदिग्ध धोरणांबाबत मला वाईट वाटते, असे त्यांनी स्पष्ट केले.
म्यानमारच्या सर्वात अवघड काळामध्ये भारताने देशाला एकाकी सोडले होते, मात्र आता म्यानमारमधील लोकशाही उभारणीसाठी भारत मदत करेल, अशी मला आशा आहे, असे बुधवारी नवी दिल्ली येथे एका व्याख्यानामध्ये त्यांनी मांडले .  गुरुवारी मुलाखतीमध्ये त्याचाच त्यांनी पुनरुच्चार केला.  भारताकडून पाठिंब्याची आशा त्यांनी व्यक्त केली.  भारत जी धोरणे राबविते ती स्वत:साठी व इतरांसाठीही   योग्य ठरणारी असू शकते, त्यामुळे भारताबाबत  मी आशावादी आहे.
भारताच्या भूमिकेबाबत फसविले गेल्याची भावना माझ्या मनात नाही.  जबरदस्तीने कुणाचाही ठाम पाठिंबा मागण्याचा आम्हाला अधिकार नाही. म्यानमारमध्ये लोकशाही उभारण्यासाठी आम्हाला जगभरातूून पाठिंबा हवा असल्याचे, त्या म्हणाल्या.  म्यानमारच्या संविधानामध्ये मुक्त आणि स्वतंत्र निवडणुकांचा पुरस्कार  करून २०१५ मधील राष्ट्रपती निवडणूक लढविण्यासाठी मी तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  लष्कराकडून मिळालेला हिंसाचार विरहीत पाठिंबा म्यानमारला लोकशाहीकडे नेण्यासाठी  उपयुक्त ठरल्याचे त्या म्हणाल्या.

आंतरराष्ट्रीय शोकांतिका
पश्चिम म्यानमारमध्ये बौद्ध आणि मुस्लिम यांच्यामध्ये सुरू असलेला हिंसाचार ही  आंतरराष्ट्रीय शोकांतिका असून, बांगला देशमधून होणारी  घुसखोरी थांबविण्याची गरज असल्याचे सूची यांनी स्पष्ट केले.  दोन्ही देशांच्या सीमाभागामध्ये बांगला देशी नागरिकांच्या घुसखोरीचा प्रश्न समान आहे. त्यामुळे या भागातील रक्तपात रोखण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.  जून महिन्यापासून हिंसाचारामुळे  म्यानमारमधील एक लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. गेल्या महिन्यात हिंसाचारामध्ये जीवीतहानी व जाळपोळही झाली होती, याची आठवण करून देत त्यांनी सांगितले की, दोन्ही  देशांच्या सीमांवरील बांगला देशी घुसखोरींच्या प्रश्नांवर तोडगा न काढल्यास तो आणखी चिघळेल.