देशात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे ते थांबविण्यासाठी नुसते कडक कायदे बनवून चालणार नाही, तर त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी सांगितले.
महिलांवरील अत्याचार रोखण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी अहिंसा संदेश योजना सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याबरोबरच त्यांना सुरक्षित वाटणे गरजेचे आहे. तसेच समाजात त्यांना योग्य तो सन्मानही मिळाला पाहिजे, असे सोनिया यांनी सांगितले. समाजाने आपले जुनाट आणि खुळचट विचार बदलले पाहिजेत. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान दिले पाहिजे. हे एक मोठे आव्हान असून महिला आणि पुरुषांमधीलही भेदाभेदांची भिंत पाडली पाहिजे. त्यासाठीची सुरुवात घरापासूनच झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. घरातील मुलांप्रमाणेच प्रत्येक मुलीला शिक्षणाचा, स्वत:च्या विकासाचा आणि नोकरी-व्यवसाय करणाचा हक्क आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी नुसते कायदे आणि धोरण आखून चालणार नाही, तर या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याच्या मुद्दय़ावर त्यांनी यावेळी भर दिला.