देशातील सर्वात निष्कलंक आणि गरीब मुख्यमंत्री म्हणून त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांचेच नाव अग्रक्रमाने घ्यावे लागणार आहे. त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता २.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
धानपूर मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना सरकार यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यामध्ये आपल्याकडे केवळ १०८० रुपयांची रोकड आणि बँकेतील खात्यात ९७२० रुपये असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मातोश्री अंजली सरकार यांच्या निधनानंतर त्यांच्या नावावर असलेले ४३२ चौ. फुटांचे घर मुख्यमंत्र्यांच्या नावावर झाले असून त्याचे बाजारमूल्य दोन लाख २० हजार रुपये इतके आहे.
तथापि, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी पांचाली भट्टाचार्य या केंद्र सरकारच्या निवृत्त अधिकारी असून त्यांच्याकडे २३ लाख ५८ हजार ३८० रुपयांच्या मुदत ठेवी आणि २० ग्रॅम सोने असून त्याचे बाजारमूल्य ७२ हजार रुपये इतके आहे. तर त्यांच्याकडे २२ हजार १५ रुपयांची रोकड आहे. सेवानिवृत्तीचा लाभ म्हणून त्यांना पैसे मिळाले असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. या दाम्पत्याकडे जंगम मालमत्ता नाही, त्यांची स्थावर मालमत्ता आणि रोकड २४ लाख ५२ हजार ३९५ रुपयांची आहे. सत्तारूढ माकपचे राज्य समिती सदस्य हरिपद दास हे पक्षाचे कोषाध्यक्ष आहेत. सरकार आपले संपूर्ण वेतन इतर सदस्यांप्रमाणे पक्षाला देणगी स्वरूपात देतात आणि त्याबदल्यात पक्ष त्यांना खर्चासाठी पाच हजार रुपये देतो, असे दास यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांचे दरमहा वेतन ९२०० रुपये इतकेच आहे.