मणिपूरच्या चूराचंदपूरमध्ये आंदोलकांनी राज्यातील दोन मंत्री, पाच आमदार आणि स्थानिक खासदारांची घरे मंगळवारी पेटवून दिली. यात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.  आंदोलकांना ऱोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात  दोन आंदोलनकर्ते ठार झाले. तर, एकाचा जळून मृत्यू झाला. पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
मणिपूरमध्ये इनर लाईन परमिटच्या मुद्द्यावरून हिंसाचार सुरु आहे. आंदोलकांनी पोलीस उपायुक्तांची गाडीही पेटवून दिली. मणिपूर विधानसभेत सोमवारी तीन विधेयके मंजूर करण्यात आली. या विधेयकांमध्ये इनर लाईन परमिटचाही समावेश होता. याच मुद्द्यावरून आंदोलकांनी पोलीस उपायुक्तांची गाडी पेटवून दिली. ‘पीपल्स प्रोटेक्शन बिल’मध्ये इतर राज्यांच्या नागरिकांना मणिपूरमध्ये प्रवेश करण्यासाठी इनर लाईन परमिट सिस्टम बनवणे आणि १९५१च्या आधीपासून वास्तव्य असलेल्या नागरिकांना संपत्तीचा अधिकार देण्याची तरतूद आहे.
या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.