बिहार निवडणुकीत रालोआच्या घटक पक्षांमध्ये आपण स्वत:च सर्वाधिक लोकप्रिय प्रचारक असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी केला आहे. रालोआतील अन्य घटक पक्षांपेक्षा आपल्या पक्षाची कामगिरी अधिक चांगली असेल, असेही मांझी म्हणाले.
भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने आपल्या पक्षाला अधिक जागा द्यावयास हव्या होत्या कारण बिहारमध्ये प्रत्येक ठिकाणी जनतेला आपल्याला पाहावयाचे आहे, असेही मांझी म्हणाले.
आपल्या पक्षाला ४० जागा दिल्या असत्या तर त्यांपैकी ३५ हून अधिक जागा आम्ही जिंकल्या असत्या. मात्र हिंदुस्थानी अवाम मोर्चा पक्षाला केवळ २१ जागाच दिल्या याची खंत भाजपला वाटल्याशिवाय राहणार नाही, असेही मांझी म्हणाले.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी म्हणजे फुटलेल्या ग्लासाचा तुकडा आहे, असे मांझी म्हणाले. रालोआला निवडणुकीत दोन-तृतीयांश बहुमत मिळेल कारण या निवडणुकीत आम्हाला आव्हानच नाही, असेही मांझी म्हणाले.
आपल्या पक्षाची कामगिरी भाजपपेक्षाही चांगली आहे कारण गरिबांसाठी आपण जे काम केले त्यामुळे त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे. मात्र आता नितीशकुमार यांनी ती कामे थांबवून सूडाचे राजकारण सुरू केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
‘काळा पैसा दडविण्यासाठी
लालूंचा दुग्धव्यवसाय’
पाटणा : दुग्धव्यवसाय आणि गाई पाळून चारा घोटाळ्यात मिळविलेला काळा पैसा राजदचे नेते लालूप्रसाद यांनी दडविला असल्याचा आरोप भाजपचे नेते सुशील मोदी यांनी बुधवारी येथे केला. गाईबद्दल आदराची भावना आहे यासाठी लालूप्रसाद यांनी गाई पाळलेल्या नाहीत अथवा दुग्धव्यवसाय सुरू केलेला नाही, तर काळा पैसा दडविण्यासाठी त्यांचे हे उद्योग सुरू आहेत, अशी टीका सुशील मोदी यांनी केली.