अखिल भारतीय पूर्ववैद्यकीय चाचणी फेरपरीक्षा – २०१५ (एआयपीएमटी)चार आठवडय़ांच्या कालावधीत पुन्हा घेणे अशक्य आहे, असे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करून चार आठवडय़ांत फेरपरीक्षा घेण्याचे आदेश दिले होते.
चार आठवडय़ांत फेरपरीक्षा घेण्याच्या आदेशाचा फेरविचार करावा, अशी विनंती सीबीएसईने एका याचिकेद्वारे केली असून, त्याबाबत सॉलिसिटर जनरल रणजितकुमार यांनी न्या. आर. के. अग्रवाल आणि न्या. ए. एम. सप्रे यांच्या पीठासमोर बाजू मांडली तेव्हा पीठाने या बाबत सुनावणी घेण्याचे ठरविले.

सात परीक्षा कशा घेणार ?
एकाच वेळी सात परीक्षांचे आयोजन करावयाचे असल्याने मंडळावर कामाचा अधिक ताण आहे. त्यामुळे फेरपरीक्षा घेण्यासाठी मंडळाला किमान तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असे सीबीएसईतर्फे स्पष्ट करण्यात आले.
बेकायदा मालमत्ताप्रश्नी वीरभद्रसिंह यांची चौकशी
नवी दिल्ली : केंद्रीय पोलादमंत्री असताना सुमारे ६ कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता केल्याच्या आरोपाबाबत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांच्या चौकशीस केंद्रीय अन्वेषण खात्याने (सीबीआय) गुरुवारी सुरुवात केली.
वीरभद्रसिंह, त्यांची पत्नी प्रतिभासिंह, मुलगा विक्रमादित्य, मुलगी अपराजिता आणि विमा प्रतिनिधी आनंद चौहान यांच्याकडे सीबीआयने विचारणा केली. ही चौकशी प्राथमिक स्वरूपाची असल्याचे सीबीआय सूत्रांनी सांगितले. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) सरकारमध्ये २००९-११ या काळात वीरभद्रसिंह हे पोलादमंत्री होते.