सुरक्षा सैनिकाच्या वेशात आलेल्या दोन आत्मघातकी अतिरेक्यांनी सोमवारी येथील सरकारी संकुलावर केलेल्या हल्ल्यात पाच जण ठार आणि अन्य आठ जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर या आत्मघातकी अतिरेक्यांनी स्वत:चाही अंत करून घेतला.
खैबर आदिवासी प्रांतातील ‘खैबर हाऊस’ येथे सरकारी कार्यालय असून तेथे सर्व राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक सुरू होण्यापूर्वी सुरक्षा सैनिकांच्या वेशात आलेल्या अतिरेक्यांनी त्या ठिकाणी हल्ला केला. बैठकीच्या सभागृहाबाहेर एका अतिरेक्याने स्वत:स उडवून दिल्याची माहिती ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’चे नेते इक्बाल खान यांनी दिली, तर दुसऱ्या आत्मघातकी अतिरेक्याने संकुलात प्रवेश करताच तेथील प्रवेशद्वाराजवळच्या रक्षकास ठार केले. त्यानंतर सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांशी त्याची सुमारे २० मिनिटे चकमक सुरू होती. त्यानंतर त्यानेही स्वत:स उडवून दिले.
दुसऱ्या हल्लेखोराने मुताहीर झेबखान यांच्या कार्यालयाजवळ स्वत:च्या अंगावरील स्फोटकांचा स्फोट घडवून आपला अंत करून घेतला. मात्र या हल्ल्यातून झेबखान बचावले. सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत सुरू असलेल्या चकमकीत चार नागरिक आणि एक सुरक्षा अधिकारी ठार झाला. याच हल्ल्यात अन्य आठ जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.