शियापंथीयांच्या मिरवणुकांवर होणारे संभाव्य हल्ले टाळण्यासाठी इस्लामाबादसह पाकिस्तानातील ५० प्रमुख शहरांमधील मोबाइल सेवा गुरुवारी खंडित करण्यात आली. अत्यंत आधुनिक स्वरूपाच्या स्फोटकांचा स्फोट घडविण्यासाठी मोबाइलचा वापर केला जाऊ शकतो, असे पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाचे म्हणणे आहे.
दहशतवादी आणि त्यांचे हॅण्डलर यांच्यात संभाषण सोपे होण्यासाठीही मोबाइलचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळेच मोबाइल सेवा खंडित करण्यात आली असल्याचे अंतर्गत मंत्रालयाचे म्हणणे आहे. तथापि, सरकारच्या या कृतीमुळे देशवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी सरकारने अन्य उपाय आखावेत, मोबाइल सेवा खंडित केल्याने जनतेला अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे, असा सूर लावला जात आहे.
मोबाइल सेवा सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत खंडित ठेवण्यात येणार आहे. पेशावरसारख्या काही ठिकाणी मोबाइल सेवा सायंकाळी ५ वाजेपर्यंतच खंडित ठेवण्यात येणार आहे. क्वेट्टा, पेशावर, रावळपिंडी, मुलतान, सरगोधा, बहावलपूर, हैदराबाद, डेरा इस्माइल खान आणि बन्नू आदी ठिकाणची सेवा खंडित करण्यात आली आहे.