गर्भवती असलेल्या मातांनी सेलफोन वापरताना काळजी घेण्याची गरज आहे कारण या फोनची रिंग वाजते तेव्हा गर्भाशयातील बाळाचे झोपेचे व उठण्याचे चक्र पार बिघडून जाते व नंतर त्याचे वाईट परिणाम होतात, असा धोक्याचा इशारा एका संशोधनात देण्यात आला आहे. साधारण २४ महिला डॉक्टर गर्भार असताना करण्यात आलेल्या प्रयोगानुसार सेलफोनची वारंवार वाजणारी रिंग व बीपचा आवाज याचा परिणाम गर्भावर काय होतो हे तपासण्यात आले.
न्यूयॉर्क सिटी येथील वायकॉफ हाइट्स मेडिकल सेंटर येथे माता व गर्भ वैद्यक विभागाचे संचालक बोरिस पेट्रिकोव्हस्की यांनी सांगितले की, मोबाईलचा गर्भातील बाळावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्याचा आमचा हेतू होता. जर महिला गर्भार असतील व त्यांना सतत मोबाईल फोन येत असतील तर वाजणाऱ्या रिंगमुळे गर्भाशयातील बाळास घातक त्रास होतो. त्याचे झोपण्याचे व जागण्याचे चक्रच बिघडून जाते. रिंगच्या केवळ आवाजामुळेच नाही तर स्पंदनांमुळेही त्याचे झोपेचे चक्र बिघडते.
ज्या निवासी डॉक्टरांवर हे प्रयोग करण्यात आले त्यांच्यात तर खूप वाईट परिणाम दिसले. काहींचे वेळेआधीच बाळंतपण झाले तर काहींचा रक्तदाबाचा त्रास वाढला, काही मुलांचे वजन जन्मत: कमी निघाले. असे असले तरी मोबाईलच्या आवाजामुळेच हे सगळे परिणाम होत असावेत याची अजून खातरजमा करण्यात आली नाही.
रहिवासी महिला डॉक्टर नेहमी फोन बाळगत असतात व बराच काळ तो अगदी जवळ ठेवलेला असतो. एक मात्र खरे की मोबाईलच्या रिंग सतत वाजत राहिल्या तर गर्भाचे वर्तन बिघडते. त्यात व्यत्यय निर्माण होतो. एकूण २८ बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ महिलांचा गर्भारपणात अभ्यास करण्यात आला त्यात मोबाईल फोन गर्भाच्या डोक्याजवळ ठेवण्यात आला होता व साधारण पाच मिनिटांनी िरग देण्यात आली. नंतर या महिलांची अल्ट्रासाउंड तपासणी करण्यात आली. सर्व गर्भ २७ ते ४१ आठवडय़ांचे होते. त्यांच्यात डोके वळणे, तोंड उघडे राहणे, थरथरणे असे परिणाम दिसले, जेव्हा दर दहा मिनिटाला रिंग देण्यात आली तेव्हा गर्भावर वाईट परिणाम दिसून आले, असे हेल्थ डे च्या बातमीत म्हटले आहे.
संशोधकांच्या मते काही गर्भाना नंतर त्या आवाजाची सवय होऊन जाते. जेव्हा फोनची रिंग सतत दहा मिनिटे वाजते तेव्हा गर्भ थरथरण्याचे प्रमाण कमी होते, त्यात ३६ आठवडय़ांच्या ६० टक्के गर्भाचा समावेश होता. मोबाईल जवळ ठेवला व त्याची रिंग वाजत राहिली तर त्यामुळे गर्भाचे नेहमीचे वर्तन मात्र बिघडते यात शंका नाही.