मोबाइल फोनच्या माहितीचा अभ्यास केला तर संसर्गजन्य व साथीचे रोग कुठे पसरत आहेत याचा अंदाज येतो असे एका वैज्ञानिक संशोधनात दिसून आले आहे. अमेरिकेतील प्रिन्स्टन व हार्वर्ड विद्यापीठांच्या वैज्ञानिकांनी वापरकर्त्यांचे नाव माहीत नसलेल्या किमान १.५ कोटी मोबाइल फोनवरील माहिती बघून केनयात रुबेलाच्या प्रसाराचा माग काढला. मोसमी आजारांचे भाकीत किंवा प्रसार होत जाण्याची ठिकाणे मोबाइलवरील माहितीच्या विश्लेषणाने सांगता येतात. मोबाइल फोनवरील माहितीचा वापर करून धोरणकर्ते लसीकरण व शाळा बंद ठेवणे असे उपाय साथीच्या रोगांमध्ये करू शकतात.
संशोधकांनी यासाठी जी पद्धत वापरली आहे, की फ्ल्यू व गोवर या रोगांमध्ये प्रसार रोखण्याकरिता वापरता येते. रोगप्रसाराच्या पद्धती कशा बदलत गेल्या हेसुद्धा मोबाइलवरील माहितीवरून दिसून येते असे या संशोधन निबंधाच्या लेखिका सी.जेसिका मेटकाफ यांनी म्हटले आहे. त्या प्रिन्स्टन विद्यापीठाच्या व्रुडो विल्सन केंद्रात सार्वजनिक व आंतरराष्ट्रीय कामकाज विषयाच्या सहायक प्राध्यापक आहेत. रुबेला हा विशिष्ट काळात पसरणारा आजार असून, लोकांच्या मोबाइलवरील माहिती घेतली तर त्याचा प्रतिबंध लोकसंख्यागतिकी (पॉप्युलेशन डायनॅमिक्स) अभ्यासतंत्राने करता येऊ शकतो असे मेटकाफ यांचे मत आहे. केनियामध्ये मोबाइल फोनवरील माहितीवरून रुबेलाचा प्रसार कसा होतो हे समजू शकते की नाही याबाबत संशोधन करण्यात आले. त्यात जून २००८ व जून २००९ दरम्यान दीड कोटी लोकांच्या मोबाइलवरची माहिती घेण्यात आली. फेब्रुवारी २००९ मधील माहिती मात्र मिळालेली नाही.
यात किमान १२ अब्ज मोबाइल फोनवरील संदेशवहन तपासण्यात आले. त्यात कुणाचीही नावे उघड करण्यात आली नव्हती. सेलफोनवरील माहितीचे विश्लेषण करून केनयातील रुबेलाच्या प्रसाराबाबत सप्टेंबर ते फेब्रुवारी दरम्यान केनयात रुबेलाचा प्रसार तीनदा झाला होता. मोबाइल फोनच्या मदतीने साथीचे रोग कसे पसरत जातात, कुठे पसरतात याची माहिती मिळते. रुबेला हा मुलांमध्ये पसरणारा आजार आहे व ते शाळेत एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्याचा प्रसार होतो. मुले जेव्हा शाळेत नसतात तेव्हा त्या काळात प्रसार कमी होतो. आता संशोधक मोबाइल फोनवरील माहितीच्या आधारे गोवर, मलेरिया व कॉलरा या रोगांचा प्रसार कसा होतो याचाही शोध घेणार आहे. प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

’रोगप्रसार शोधून तो रोखण्यासाठी मोबाइलचा वापर.
’कॅनडातील रुबेला रोगाच्या प्रसाराची मोबाइलच्या मदतीने माहिती.
’लोकसंख्यागतिकी शास्त्राचा वापर.
’मलेरिया, गोवर, कॉलरा या रोगांचा प्रसारही शोधणार.