पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लंडनमध्ये अभूतपूर्व स्वागत करून जगाचे डोळे दिपविण्यासाठी जोरदार तयारीला लागलेल्या अनेक लंडनवासी भारतीयांना घरवापसीची स्वप्ने अनावर होऊ  लागली आहेत. एकदा का भारतात ‘अच्छे दिन’ सुरू झाले की इंग्लंडमधील गाशा गुंडाळायचा आणि जन्मभूमी भारतात बस्तान बसवायचे, असे मनसुबे अनेकांच्या डोळ्यापुढे तरळताना दिसतात. इंग्लंडमधील काही तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या ‘मोदी एक्स्प्रेस’ नावाच्या गटात सुमारे हजारभर भारतीय तरुणांचा समावेश आहे. यातील अनेक जण आपले आईवडील आणि आठवणींची मुळे भारतात ठेवून लंडनमध्ये आले आहेत. गेल्या दीड-दोन दशकांत येथे दाखल झालेल्या अनेकांना, व्यावसायिकदृष्टय़ा इंग्लंडमध्ये स्थिरावून सुखवस्तू आयुष्याची सुरुवात करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. नोकरीच्या निमित्ताने येथे असणाऱ्यांच्या तुलनेत, व्यवसायासाठी येणाऱ्यांचा संघर्ष काहीसा अधिक खडतर आहे. पीयूष गोहिल नावाचा तरुण दहा-अकरा वर्षांपूर्वी बडोद्याहून लंडनला आला. पत्नी, तीन-चार वर्षांचा मुलगा असे हे त्रिकोणी कुटुंब बऱ्यापैकी स्थिरावते आहे. व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शन सल्लागार म्हणून हा तरुण लंडनमध्ये स्वत:चा व्यवसाय करतो. पण त्याला आता भारतात परत येण्याची अनावर ओढ लागली आहे. भारत सोडून इंग्लंडमध्ये आलो तेव्हाची परिस्थिती निराळीच होती. जागतिक स्तरावर व्यवसाय करण्याच्या संधी तेव्हा भारतात अभावानेच आढळत होत्या. त्यामुळे लंडन गाठण्याचा निर्णय घेतला, असे हा तरुण म्हणाला. मात्र आता भारताचे चित्र पालटते आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून नव्या संधींची पहाट भारतात उगवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ज्या कारणासाठी देश सोडला, ते कारण आता तेथे नसेल, असा आशावाद पीयूषच्या शब्दाशब्दांत दिसतो. भारतात अच्छे दिन येणारच, असा विश्वासही त्याला वाटतो. त्यामुळे आता भारतात परतावे, असे त्याला वाटू लागले आहे. मुलगा अजून लहान आहे. त्याला समज येऊन लंडनच्या जगण्याची भुरळ पडण्याआधी हा योग यावा अशी त्याची इच्छा आहे.

पीयूष हा ‘मोदी एक्स्प्रेस’ ग्रुपच्या संस्थापकांपैकी एक! भारतातील ‘अच्छे दिन’ युगाकडे आपल्यासारखे अनेक जण डोळे लावून बसले आहेत असे तो म्हणतो. अच्छे दिन सुरू होण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागेल, पण ते सुरू झाले की ‘मोदी एक्स्प्रेस’ लंडनकडून ‘इंडिया’कडे धावू लागेल, असा पीयूषचा ठाम विश्वास आहे. भारतात परतल्यावर बडोद्यातच स्थायिक व्हायचे असे त्याने ठरवले आहे. अच्छे दिन तर देशभर असणार, मग तिकडे परतल्यावर आईवडिलांपासून, घरापासून लांब कशाला राहायचे?.. मग इकडे किंवा तिकडे यात फरक काय राहिला, असा सवाल पीयूषने केला, तेव्हा त्याच्या घरवापसीच्या निर्णयातील ठामपणा स्पष्टपणे व्यक्त झाला.

भारतातील अशा भविष्यकाळाचे संकेत मोदी यांच्या आगामी लंडनभेटीत मिळतील, असा येथील अनेकांचा विश्वास आहे. मोदी सरकारच्या कारकीर्दीचा पंधरा महिन्यांचा काळ त्यांचे मूल्यमापन करण्यासाठी पुरेसा नाही, त्यासाठी आणखी काही महिने, वर्षे द्यावी लागतील, असाच येथील मूळ भारतीयांचा सूर आहे.मोदी यांचा इंग्लंड दौरा अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास लंडनमधील भारताचे उच्चायुक्त रंजन मथाई यांनाही वाटतो. या भेटीमुळे उभय देशांतील राजनैतिक, सांस्कृतिक संबंधांच्या गाठी अधिक घट्ट होतील, असा विश्वास भारतातून येथे आलेल्या पत्रकारांशी ‘भारत भवन’मध्ये झालेल्या गप्पांच्या अनौपचारिक कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. इंग्लंड सरकारही मोदी यांच्या या भेटीसाठी उत्सुक आहे, असे संकेत वरिष्ठ सरकारी वर्तुळातून मिळतात. उभय देशांतील गुंतवणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची ठरेल, असे काहींना वाटते.