नवी दिल्लीत होणाऱ्या तिसऱ्या इंडिया-आफ्रिका फोरम समिटमध्ये (आयएएफएस) सहभागी होणाऱ्या जागतिक नेत्यांसाठी ‘मोदी कुर्ता’ शिवण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आहे, त्याची राज्यसभा खासदार परिमल नाथवानी यांनी स्तुती केली आहे. यामुळे खादीच्या विक्रीला चालना मिळेल, असेही नाथवानी यांनी म्हटले आहे.

दिल्लीत २६ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या परिषदेत सर्व म्हणजे ५४ आफ्रिकन देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने आफ्रिकन देशांच्या दूतावासांना पत्र लिहिले असून त्यांच्या प्रमुखांच्या कपडय़ांचे माप देण्यास सांगितले आहे. त्यांच्यासाठी ‘कुर्ता-पायजमा’ आणि ‘मोदी कुर्ता’ शिवण्यात येणार आहे, असे नाथवानी यांनी सांगितले.

यामुळे आफ्रिकी देशांमध्ये खादीचा प्रचार होणार आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये खादी प्रसिद्ध झाली आहे. खादी केवळ कपडा नाही, तर विचारसरणी आहे आणि त्यामुळे खादीच्या विक्रीला चालना मिळेल, असे नाथवानी यांनी म्हटले आहे.