गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत निर्भेळ यश संपादन करून विद्यमान मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पुढील बुधवारी म्हणजेच २६ डिसेंबर रोजी सलग चौथ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी गांधीनगर येथे जाऊन राजभवन येथे राज्यपाल कमला बेनिवाल यांची भेट घेतली. मोदी यांनी स्वत:सकट आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा या वेळी त्यांच्याकडे सादर केला.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी घटनेतील दायित्वानुसार आपला राजीनामा राज्यपाल महोदयांकडे सादर करण्याची प्रथा आहे. त्यानुसार बेनिवाल यांच्याकडे जाऊन राजीनामे देण्यात आल्याचे गुजरात भाजपचे प्रवक्ते विजय रुपानी यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी घोषित झाल्यानंतर राज्यपालांनी प्रथेप्रमाणे विधानसभा विसर्जित केली होती.
गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी ११५ ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले असून, सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्याबळाच्या तुलनेत ही संख्या २३ने अधिक आहे. २५ डिसेंबर रोजी भाजपच्या नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांची बैठक होणार असून, त्यात मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असेही रुपानी म्हणाले.
वल्लभभाई पटेल मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली त्यास उपस्थित राहणार आहेत.