बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेतील वैज्ञानिक डॉ. साथिस सी. राघवन यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संशोधकांच्या गटाने एक रेणू शोधून काढला असून त्यामुळे कर्करोगावरील उपचारात क्रांतिकारी बदल घडून येतील असा त्यांचा दावा आहे.
  या रेणूचे नामकरण साथिस याच्या नावाच्या आद्याक्षरांवरून एससीआर ७ असे करण्यात आले आहे. हा रेणू शोधून काढणाऱ्या वैज्ञानिकात आयबीएबी, बंगळुरू, केएलई कॉलेज ऑफ फार्मसी, बंगळुरू व एसीटीआरईसी, मुंबई या संस्थांच्या वैज्ञानिकांचाही समावेश आहे. या संशोधनाची माहिती सेल या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात देण्यात आली आहे.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसचे सहायक प्राध्यापक साथीस यांनी सांगितले की, या रेणूचा शोध हा कर्करोगावरील उपचारांना नवीन दिशा देणारा ठरणार आहे. त्यातून नवीन औषधे तयार करता येतील. साथीस हे मूळ केरळातील कण्णूर जिल्ह्य़ातील आहेत.
जगातील वैज्ञानिक असे मानतात की डीएनएच्या दुहेरी धाग्यातील खंड हा डीएनएच्या हानीचा सर्वात घातक प्रकार आहे, त्यामुळे जनुकीय अस्थिरता निर्माण होऊन कर्करोगासारखे विकार होतात. डीएनएच्या धाग्यातील हे तुटलेपण दुरुस्त करण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे एकसंध प्रकाराने त्याची फेरजुळणी व दोन टोकांची जुळणी करणे. एससीआर ७ हा रेणू नेमके डीएनएच्या टोकांची एकसंधता नसलेली जुळणी रोखतो व त्यामुळेच त्याचा वापर कर्करोगाच्या उपचारात करता येणे शक्य आहे.