केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमच्या निशाण्यावर असल्याची कबुली सोलापूरातून अटक करण्यात आलेल्या तीन संशयीत दहशतवाद्यांनी दिली असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सुशीलकुमार शिंदेंच्या मागावर असून ते आपल्या मतदार संघात म्हणजेच सोलापूरात कितीवेळा येतात? याचाही अंदाज या दहशतवाद्यांकडून घेण्यात येत होता अशीही माहिती समोर आली आहे.
सुशीलकुमारांचे सोलापूर असुरक्षित?
सोलापूरात सुशीलकुमार शिंदे एका लग्नाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार होते. त्या घरापासून काही मीटर अंतरावर असलेल्या एका घरातून या तीन दहशतवाद्यांना मध्यप्रदेश पोलीस आणि दहशतवादी विरोधी पथक(एटीएस) यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी अटक केली. या दहशतवाद्यांकडून तीन शक्तिशाली बॉम्ब हस्तगत करण्यात आले असून स्फोटकेही जप्त करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची हम्मद सादिक वहाब लुंजे, उमर अब्दुल हाफीज दंडोती आणि खालीद अहमद अशी नावे असून या तिघांचा ‘सिमी’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. चौकशी दरम्यान, दहशतवादी अफजल गुरू आणि मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा आरोपी अजमल कसाब यांना सुशीलकुमार शिंदे यांनी फाशीची शिक्षा दिल्याने शिंदे आमचे लक्ष्य असल्याचे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी कबुल केले आहे.
दरम्यान, मध्यप्रदेश पोलिसांनी उज्जैन येथून आणखी काही संशयीत सिमी दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून काही स्फोटकेही हस्तगत करण्यात आलेली आहेत. अटक करण्यात आलेल्यांची अनुक्रमे जावेद नागोरी, अब्दुल अझीझ, मोहम्मद आदील आणि अब्दुल वाहीद अशी नावे असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.