येत्या पाच वर्षांत रेल्वे सेवा सुधारण्यासाठी सरकार १२० अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करीत असून इतर देशांनी भारतात उत्पादन करावे, असे आवाहन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केले आहे. शून्य अपघात मोहिमेचेही त्यांनी समर्थन केले असून रेल्वे अपघात होऊच नयेत असेच आपलेही मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रभू यांनी सांगितले की, रेल्वेचा भर वाहतुकीवर असला पाहिजे, शिवाय अपघात विशिष्ट कालमर्यादेत शून्य पातळीवर आणले पाहिजेत. जगात सगळीकडे सुरक्षित वाहतुकीवर भर दिला जात असताना भारतही त्याला अपवाद नाही. प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरक्षित प्रवास शक्य आहे. मेट्रो व वेगवान गाडय़ांमधील यंत्रणांबाबत आयोजित परिसंवादास जपान, कोरिया, रशिया व इतर देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. रेल्वे क्षेत्रात अनेक देशांशी भारताने तांत्रिक सहकार्य आहे. रेल्वे क्षेत्रात गुंतवणुकीला मोठा वाव आहे. सरकार येत्या पाच वर्षांत १२० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. परदेशातून गुंतवणूक येण्याची अपेक्षा करताना त्यांनी सांगितले की, भारतात सकुशल मनुष्यबळ आहे, मोठी बाजारपेठ आहे, उत्पादनाच्या सुविधा आहेत. निर्यातक्षमता आहे. मेक इन इंडियासाठी भारतात सकारात्मक वातावरण आहे. इतर देशांनी भारतात येऊन उत्पादन करावे व येथूनच निर्यात करावी. नियंत्रण व सुरक्षा प्रणालीवर भर देऊन रेल्वे अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे.