‘सर्व मंत्रालयांचा कारभार सचिवांमार्फत एकहाती चालविणारे पंतप्रधान,’ या विरोधकांच्या टीकेला छेद देण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्र्यांना आपापल्या मंत्रालयाच्या कामकाजाचे चार स्लाइड्समध्ये सादरीकरण करण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयातून सर्व मंत्रालयांना धाडलेल्या पत्राद्वारे मोदी यांनी दिले आहेत. या सादरीकरणादरम्यान कॅबिनेट सचिव व मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी केवळ बघ्याच्या भूमिकेत राहतील. संबधित खात्याचा मंत्री वा राज्यमंत्रीच सादरीकरण करेल, अशा स्पष्ट शब्दात पंतप्रधान कार्यालयाने विभागाच्या सचिवांना कळविले आहे. या पत्रानंतर अनेक मंत्र्यांच्या जिवात जीव आला, तर काही मंत्र्यांनी आपल्या खात्याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे किमान डझनभर मंत्र्यांना पंधरा महिन्यांनंतर पहिल्यांदाच सचिवांपेक्षा जास्त महत्त्व आले आहे.

सादरीकरणासाठी प्रत्येक मंत्रालयास दहा मिनिटे मिळतील. पहिल्या स्लाइडमध्ये विभागाने गेल्या पंधरा महिन्यांत केलेली विकासकामे, दुसऱ्या स्लाइडमध्ये मंत्रालयाची आर्थिक स्थिती, आव्हाने व समस्या, तर तिसऱ्या स्लाइडमध्ये वर्षभरासाठी ‘रोडमॅप’ची माहिती द्यावी लागेल. अखेरच्या स्लाइडमध्ये वर्षभराची ध्येयनिश्चिती सांगावी लागेल. राज्य व केंद्र संबंधांकडे मोदी यांचे विशेष लक्ष आहे. प्रत्येक मंत्रालयास राज्यांशी प्रभावी समन्वय साधण्यासाठी रणनीती आखण्याची सूचना पंतप्रधानांनी केली आहे. प्रत्येक जिल्हास्थानी मंत्रालयाची प्रभावी संलग्नता होण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी लागतील. मोदी यांनी दहा मंत्रालयांचा एक गट तयार केला आहे. गटनिहाय सादरीकरण केले जाईल. आपापल्या गटाच्या सादरीकरणादरम्यान उर्वरित नऊ मंत्र्यांना उपस्थित राहण्याची सक्ती मोदी यांनी केली आहे. सादरीकरणानंतर याचा आढावा मंत्र्यांनाच घ्यावा लागेल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
‘हेडमास्तर’ मोदी यांच्या या पत्रानंतर सचिवांमार्फत कारभार चालणाऱ्या मंत्रालयांमध्ये धावपळ सुरू झाली आहे. कृषी, आदिवासी विकास, अल्पसंख्याक, सांस्कृतिक व पर्यावरण तसेच आयुष मंत्रालयांमध्ये मंत्री सायंकाळी उशिरापर्यंत सादरीकरणाचा आराखडा बनविण्यात मश्गूल आहेत.

‘ही तर शक्कल’
गेल्या पंधरा महिन्यांत मंत्र्यांच्या कामगिरीचे प्रगतिपुस्तक बनवून मोदींनी जरब निर्माण केली आहे. ‘मोदी एकहाती सत्ता राबवितात, अनेक मंत्र्यांना अधिकार नाहीत,’ अशी टीका विरोधक करीत असतात. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी व मंत्र्यांवर वचक कायम ठेवण्यासाठी मोदी यांनी सादरीकरणाची शक्कल लढविली असल्याची प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.