मुंबईची झोपडपट्टी आणि येथील भ्रष्टाचार यांचा लेखाजोखा मांडणाऱ्या अमेरिकी पत्रकार कॅथरिन बू यांच्या ‘बिहाईंड द ब्युटिफूल फॉरएव्हर्स: लाइफ, डेथ, अ‍ॅण्ड होप इन मुंबई अंडरसिटी’ या पुस्तकाला अमेरिकेचा यंदाचा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार मिळाला आहे.
काय आहे पुस्तकामध्ये?
‘बिहाईंड द ब्युटिफूल फॉरएव्हर्स: लाइफ, डेथ, अ‍ॅण्ड होप इन मुंबई अंडरसिटी’ हे पुस्तक मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या अण्णावाडी या झोपडपट्टीमधील अनेक व्यक्तींच्या सत्यकथा मांडल्या आहेत. कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तींपासून ते झोपडपट्टी माफिया यांचे आजवर अनभिज्ञ असलेले जग या पुस्तकामध्ये चितारित झाले आहे. तीन वर्षे या झोपडपट्टीमध्ये राहून कॅथरिन बू यांनी आपले रिपोर्ताज या पुस्तकामध्ये मांडले आहेत.
कोण आहेत कॅथरिन बू?
सध्या न्यूयॉर्कर साप्ताहिकामध्ये कार्यरत असलेल्या कॅथरिन बू पत्रकार सुनील खिलनानी यांच्या पत्नी आहेत. खिलनानी यांचे भारतावरचे ‘द आयडिआ ऑफ इंडिया’ हे पुस्तक लोकप्रिय आहे. २००० साली कॅथरिन बू यांची वॉशिंग्टन पोस्टमधील  सार्वजनिक सेवेवरील लेखमाला पुलित्झर पुरस्काराने गौरविण्यात आली होती.  
चार भारतीय लेखकांमध्ये पुरस्कारासाठी स्पर्धा
 नवी दिल्ली : अरविंद अडिगा, अमिताव घोष यांच्यासह चार भारतीय लेखक २०१३ साठीच्या डब्लिन साहित्य पुरस्कारासाठी स्पर्धेत आहेत. अडिगा यांची ‘लास्ट मॅन इन टॉवर’, घोष यांची ‘ रिव्हर ऑफ स्मोक’, राहुल भट्टाचार्य यांची ‘ द स्लाय कंपनी ऑफ पीपल हू केअर’, भारतीय वंशाच्या कॅनडास्थित लेखिका अनिता राव यांची टेल इट टू द ट्रीज’ या कादंबऱ्या एक लाख युरोच्या पुरस्कारासाठी स्पर्धेत आहेत.  हा पुरस्कार इंग्रजी भाषेत प्रसिद्ध झालेल्या वा भाषांतरित झालेल्या पुस्तकासाठी दिला जातो.  सध्या स्पर्धेत असलेल्या दीडशे स्पर्धकांसोबत या लेखकांच्या पुस्तकांना मात करावी लागणार आहे. ९ एप्रिल रोजी या पुरस्काराची लघुयादी प्रसिद्ध होणार असून जून महिन्यामध्ये पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.