अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या कुलगुरूंचे वक्तव्य

मुसलमान रमझानच्या महिन्यात तसेच शुक्रवारी वेळ ‘वाया घालवतात’ आणि त्यामुळे त्यांच्या सद्य:स्थितीसाठी तेच जबाबदार आहेत, असे वक्तव्य अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे (एएमयू) कुलगुरू जनरल (निवृत्त) झमिरुद्दीन शाह यांनी म्हटले आहे.

आपण सारे रमझानच्या महिन्यात किंवा दर शुक्रवारी कमी काम करतो. यामुळे व्यक्तीची क्षमता कमी होते. ही गोष्ट आपल्या समाजाच्या सद्य:स्थितीसाठी जबाबदार आहे, असे रविवारी एएमयूच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले.

कुठलीही संस्कृती, जी अनुत्पादक लोकसंख्येच्या ५० टक्के असलेल्या महिलांना गुलाम बनवते, ती स्वत:लाच गुलामीत ढकलते, असे सांगून शाह यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा पुरस्कार केला.

गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून दादरी येथे ५० वर्षांच्या व्यक्तीला ठार मारण्यात आल्याच्या घटनेचा त्यांनी निषेध केला, परंतु याकडे एखाद्या विशिष्ट दृष्टिकोनातून आपण पाहात नसल्याचे ते म्हणाले.

हिंदू युवा वाहिनी या उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या नेत्यांनी एएमयूच्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी ‘हेतुपुरस्सर’ जातीय विधाने जारी केल्याचा आरोप करून, या संघटनेच्या एका युवकाविरुद्ध अलिगढ विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच तक्रार दाखल केली असल्याचे शाह या वेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.