अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांबद्दल अनुद्गार काढणाऱ्या अशिष नंदी यांच्यावर सर्वच थरातून टीका होत असताना प्रसिद्ध दलित कार्यकर्ते आणि लेखक कांचा इलियाह यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. नंदी यांनी केलेले वाईट विधान चांगल्या भावनेतून केल्याचे इलियाह यांनी म्हटले आहे.
आशिष नंदी हे आरक्षणाच्या विरोधात नाहीत. त्यांनी मागासवर्गीय समाजाबद्दल अनुद्गार काढले असले तरी त्यामागे चांगली भावना असल्याचे इलियाह यांनी म्हटले आहे. गेल्या शनिवारी जयपूर येथील साहित्य मेळाव्यात बोलताना नंदी यांनी मागासवर्गीय समाजातील लोक अतिशय भ्रष्ट असल्याचे बेताल वक्तव्य केले होते. त्यानंतर सर्वच थरातून त्यांच्यावर टिकेची झोड उटली. बसपच्या नेत्या मायावती यांनीही नंदी यांचा कडक शब्दात समाचार घेतला. तसेच या बेताल वक्तव्याबद्दल नंदी यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आला आहे.
सर्वच थरातून टिकेची झोड उठल्यानंतर नंदी यांनी घुमजाव करीत आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे स्पष्ट करीत सारवासारव केली. तर कांचा इलियाह यांनीही नंदी यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत पत्रकारांना सांगितले की, समाजातील भ्रष्टाचाराला उच्च जातीचे अधिक जबाबदार असून मागासवर्गीयदेखील त्या भ्रष्टाचाराच्या प्रक्रियेत उतरले असल्याचे नंदी यांना म्हणावयाचे होते. कांचा इलियाह हे हैदराबाद येथील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाच्या संशोधन विभागाचे प्रमुख आहेत. तसेच व्हाय आम अ‍ॅम नॉट ए हिंदूु आणि गॉड अ‍ॅज पॉलिटिकल फिलॉसॉफर  बुद्धाज चॅलेंज टू ब्राम्हिनिजम या पुस्तकांचे ते लेखक आहेत.