दलित समाजाविरोधात वक्तव्य केल्याच्या आरोपामुळे अटक होईल, या भीतीने प्रसिद्ध लेखक आशीष नंदी यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आपल्याविरोधात दाखल केलेली तक्रार रद्द करण्यात यावी यासाठी नंदी यांनी याचिका दाखल केली आहे. दरम्यान, या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
मुख्य न्या. अल्तमश कबीर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने नंदी यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. नंदी यांच्या वकिलांनी या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची न्यायालयाला विनंती केली होती.
नंदी यांना तातडीने अटक करण्यासाठी बसपाच्या नेत्या मायावती आणि एससी-एसटी आयोगाचे अध्यक्ष पी. एल. पुनिया आदींनी दबाव टाकला आहे. त्यामुळे अटकेची भीती वाटत असल्यामुळे संभाव्य अटकेविरोधात दाद मागण्याचा मूलभूत अधिकार नंदी यांना असल्याचे त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
दरम्यान, जयपूर साहित्य मेळ्याच्या व्यासपीठावरून बोलताना नंदी यांनी मागास समाजातील व्यक्ती अधिक भ्रष्ट असल्याचे कथित वक्तव्य केले होते. नंदी यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात खळबळ माजली आणि त्यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच त्यांच्या अटकेची मागणी होऊ लागली.