भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन एका चहावाल्याच्या पत्राला उत्तर देतात हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. होय, ही गोष्ट आहे मध्य प्रदेशातील इंदूर येथील एका चहावाल्याची. हा चहावाला अमिताभ बच्चन, पोप बेनेडिक्ट (सोळावे), नरेंद्र मोदी इत्यादी देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्तींशी पत्राच्या माध्यमातून संपर्कात आहे. नरेंद्र मोदी आणि अमिताभ बच्चनसारखी प्रसिद्ध मंडळी आपल्या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून त्याला पत्र लिहितात. इंदूर येथे राहणारे ५० वर्षीय रामू नागर गेल्या बारा वर्षांपासून दिवसाचे बारा तास चहा विकण्याचा व्यवसाय करत आहेत. चहा विकण्याबरोबरच ते देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्तींना पत्रदेखील लिहितात. १०० पेक्षा अधिक व्हीआयपी व्यक्तींचा पत्रसंग्रह त्यांच्याकडे असल्याचे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल! यात सर्वात जास्त पत्रे अमिताभ बच्चन यांनी पाठवली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील आत्तापर्यंत त्यांना सहा वेळा पत्र पाठवले आहे. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करणारे पत्र रामू यांनी बिग बींना लिहिले होते. अमिताभ बच्चन यांनी स्वहस्ताक्षरात हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या काही ओळी उत्तरादाखल पाठविल्या होत्या. एवढेच नव्हे तर पत्रावर अमिताभ यांच्याबरोबर जया बच्चन यांनीदेखील स्वाक्षरी केली होती.
महाराणी एलिझाबेथ, टोनी ब्लेअर, पोप बेनेडिक्ट, भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान, मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत सर्वांना ‘रामू टी स्टॉल, एलआईजी चौराहा, रेशम लेन कंपाऊंड, इंदौर’ हा पत्ता चांगलाच ठाऊक आहे.