गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे सुयोग्य उमेदवार आहेत, असे मत खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी व्यक्त केले आहे. दरवेळी वादग्रस्त वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जेठमलानी यांनी वरील मत मांडताना एक विशेष टीप जोडली आहे. मोदींबद्दल त्यांनी व्यक्त केलेले मत हे स्वतःचे असून, पक्षाच्या धोरणांशी त्यांचा संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार लवकरात लवकर जाहीर करावा. लोकांच्याही पक्षाकडून तीच अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मोदींच्या नावाशी जोडले गेलेले जातीयवादाचे समीकरण त्यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखेल का, या प्रश्नाचे उत्तर देताना जेठमलानी म्हणाले, धर्मनिरपेक्ष आणि जातीयवादी या संज्ञा सध्या एखाद्याला बदनाम करण्यासाठी वापरल्या जातात. अनेक लोकांना त्याचा अर्थही माहिती नसतो. मोदी हे १०० टक्के धर्मनिरपेक्ष असल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला.
गुजरातमधील आणि देशातील मोदीं यांचे विरोधक त्यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर वाटेल ते आरोप करीत आहेत. असे सांगून सुषमा स्वराज यांच्या पंतप्रधान पदाच्या दावेदारीबद्दल कोणतेही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.
भाजपने मोदी यांना पंतप्रधान पदाची उमेदवारी दिली, तर संयुक्त जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडेल, याबद्दल विचारल्यावर जेठमलानी यांनी तसे काहीही घडणार नाही. जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष म्हणून कायम राहील, असे मत नोंदवले.