गुजरातमध्ये भाजपला आपल्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवून देणारे नरेंद्र मोदींनी आज (बुधवार) गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शानदार सोहळ्यात नरेंद्र मोदींनी पद आणि गोपलियतेची शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदाची मोदी यांची ही सलग चौथी वेळ आहे. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे, एआयडिएमकेच्या जयललिता, रामदास आठवले, अभिनेते विवेक ओबेरॉय, प्रकाशसिंह बादल, नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय या शपथविधी सोहळ्याला उपस्थितीत होता.
गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी ११५ ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले असून, सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्याबळाच्या तुलनेत ही संख्या २३ने अधिक आहे. २५ डिसेंबर रोजी झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री या नात्याने मोदी यांची सर्वानुमते घोषणा करण्यात आली. या वेळी केंद्रीय निरीक्षक म्हणून भाजपचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली उपस्थित होते.
मोदी सर्वात प्रथम २००१ साली केशुभाई पटेल यांच्या जागी मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर गुजरात दंगलीच्या पार्श्वूभूमीवर २००२ साली झालेली निवडणूक आणि २००७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीतही त्यांनी घवघवीत यश मिळवले होते.