आतापर्यंतच्या रोव्हर्सपेक्षा सरस
नासाची नवीन रोव्हर गाडी २०२० मध्ये मंगळावर सोडली जाणार असून ती अणुइंधनावर चालेल. आताच्या क्युरिऑसिटी व अ‍ॅपॉरच्युनिटी रोव्हरगाडय़ांपेक्षा ती जास्त प्रगत असणार आहे. ही गाडी आता तयार करण्यात येत आहे. अनेक बाबतीत ही गाडी आधीच्या रोव्हर गाडय़ांपेक्षा वेगळी आहे.
स्पेस डॉट कॉमच्या वृत्तानुसार नवीन रोव्हर गाडी वजनदार असेल व तिची चाके लांब व जास्त जड असतील त्यामुळे ही गाडी मंगळावर वेगळ्या पद्धतीने मार्गक्रमण करणार आहे. श्रीमती जेनिफर ट्रॉसपर यांनी सांगितले की, ही गाडी वेगाने चालेल, जास्त वैज्ञानिक माहिती गोळा करील यादृष्टीने आम्ही पावले उचलत आहोत. यावेळी आमचा भर हा चाके जास्त मजबूत करण्यावर आहे. क्युरिऑसिटी गाडीपेक्षा ही गाडी जास्त वेगाने चालू शकेल. अलगॉरिथमच्या मदतीने तिची दिशा हवी तशी बदलता येईल. थोडक्यात ती स्मार्ट म्हणजे चतूर असेल. गाडी चालवण्यात अडचणी असणार नाहीत किंबहुना त्यावर फार वेळ खर्च होणारच नाही. मंगळावरील महत्त्वाच्या भागांवर ही गाडी जाईल तसेच तेथील वैज्ञानिक माहिती पाठवेल. जेनिफर यांच्या मते क्युरिऑसिटीपासून विचार केला, तर त्या गाडीची कार्यक्षमता ५५ टक्क्य़ांवरून ८० टक्के केली होती. आता २०२० मध्ये मंगळावर जाणाऱ्या रोबोट रूपातील या रोव्हर गाडीची कार्यक्षमता ९५ टक्के इतकी असेल.
अमेरिकेची नवी रोव्हर गाडी
* २०२० मध्ये मंगळावर जाणार
* चाके अधिक मजबूत करणार
* कार्यक्षमता ९८ टक्के
* नवीन भागांना भेट देऊन वैज्ञानिक माहिती देणार.