देशात सध्या अंतर्गत दहशतवाद सुरू असून पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी हत्या आणि दादरी प्रकरणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत, असे प्रतिपादन करीत सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांनी त्यांना मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार सरकारला परत केला आहे.

देशाचे पहिले पंतप्रधान जवारलाल नेहरू यांची भाची असलेल्या नयनतारा सहगल यांचा ‘रिच लाईक अस’ या इंग्रजी कांदबरीसाठी साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. मात्र, देशात सध्या सुरू असलेल्या हत्या प्रकरणांवर नयनतारा यांनी नाराजी व्यक्त करीत आपला पुरस्कार परत केला आहे. पुरस्कार परत करताना सहगल यांनी ‘अनमेकींग ऑफ इंडिया’ या शिर्षकाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहीले आहे. अंधश्रद्धेविरोधात लढणाऱया, हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रथांवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱयांची हत्या करणाऱया आणि खाण्याच्या सवयीवर बंधन घालू इच्छिणाऱया प्रवृत्तींना देशात बळ मिळत असून हे अतिशय दुर्देवी असल्याचे सहगल यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. मोदी हे उत्तम वक्ते आहेत. मोठ-मोठी भाषणे त्यांनी दिली आहेत. ट्विटर आणि इतर समाजमाध्यमांमध्ये ते बरेच सक्रीय असतात पण, ‘दादरी’सारख्या धक्कादायक प्रकरणावर मोदींनी बाळगलेले मौन स्वागतार्ह नाही. त्यामुळे या घटनांना देशाचे प्रमुख म्हणून मोदीच जबाबदार आहेत, अशी टीका सहगल यांनी केली आहे.