सूर्याच्या घातक प्रारणांपासून अंतराळवीरांचे संरक्षण करण्यासाठी वैज्ञानिक स्टार ट्रेक स्टाइल चित्रपटात दाखवण्यात आले आहे तसे चुंबकीय अवकाश सुरक्षा तवच तयार करीत आहेत. संशोधकांच्या मते वजनाला अतिशय हलके असे हे कवच ऑक्सफर्डशायर येथे रूदरफोर्ड अ‍ॅपलटन प्रयोगशाळेत तयार केले जात आहे त्याचा उपयोग नासाच्या मंगळ व चांद्र मोहिमांसाठी होऊ शकेल.
सूर्यापासून निघणारे वैश्विक किरण व उच्चउर्जेची वादळे यामुळे अंतराळवीरांना धोका निर्माण होऊ शकतो, अंतराळ संशोधकांसाठी तो नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे.
या प्रारणांमुळे अंतराळवीरांना उलटय़ा, डायरिया, अवयव निकामी होणे असे परिणाम भोगावे लागू शकतात. आता तयार करण्यात असलेल्या वजनरहित चुंबकीय कवचात पृथ्वीभोवती असलेल्या चुंबकीय आवरणासारखेच आवरण तयार केले जात आहे. हे लघु मॅग्नेटोस्फिअर (चुंबकीय आवरण) अंतराळयान व अंतराळवीर यांच्याभोवती असल्याने त्याच्या विद्युतभारामुळे सूर्याची प्रारणे यानावर न आदळता विचलित होऊन दुसऱ्या दिशेने जातात. स्टार ट्रेकमध्ये अशा अनेक कल्पना होत्या ज्या प्रत्यक्षात आल्या नव्हत्या, त्या आता येत आहेत असे एका वैज्ञानिकाने सांगितले. वाहत्या प्लाझ्मात असलेल्या एखाद्या पदार्थाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार केले तर हलके अशलेले इलेक्ट्रॉन नवीन चुंबकीय क्षेत्राचा मार्ग अनुसरतात पण आयनचा वेग खूप जास्त असतो ते चुंबकीय क्षेत्रांच्या रेषांना अनुसरत नाहीत. पृथ्वीप्रमाणे जर चुंबकीय क्षेत्र निर्माण केले तर अंतराळवीरांचे सूर्याच्या प्रारणांपासून संरक्षण करता येते, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.