केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमार्फत होणाऱ्या भरतीत कुठलेही रॅकेट नाही व प्रश्नपत्रिका फुटलेल्या नाहीत असे सरकारने लोकसभेत सांगितले.
दरम्यान राज्य कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षेत किमान १२०० विद्यार्थ्यांनी मोबाईल फोन, चुकीची ओळखपत्रे असा गोंधळ केल्याचे प्रकार गेल्या चार वर्षांत घडले आहेत. कार्मिक व सार्वजनिक तक्रारी खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटलेल्या नाहीत, शिवाय यात कुठलेही रॅकेट नाही. राज्य कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षेतही प्रश्नपत्रिका फुटलेल्या नाहीत मात्र जानेवारी ते जून २०१५ दरम्यान १२४३ विद्यार्थी गैरप्रकारात सापडले आहेत. या विद्यार्थ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना तीन ते पाच वर्षे परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिथे असे प्रकार घडले तेथील परीक्षा केंद्रेही रद्द करण्यात आली आहेत. चौकशी संस्थांच्या मते काही संघटित गट अशा गैरकृत्यात सामील आहेत. या परीक्षांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी मोबाईल जॅमर्स वापरण्यात येत असून ब्लू टूथ, मोबाईल चालणार नाहीत
अशी व्यवस्था केली जात आहे. काही परीक्षा केंद्रांवर चित्रीकरण केले जात आहे.