भारत-चीन सीमेवर अज्ञात उडत्या वस्तू (यूएफओ) सापडल्याचा कुठलाही पुरावा नाही, परंतु शेजारी देशाच्या सीमेलगत होत असलेल्या सर्व घडामोडींवर सरकारचे लक्ष आहे, असे संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी आज लोकसभेत सांगितले.
लष्कराच्या लेह येथील तुकडीला अज्ञात उडत्या वस्तू भारत-चीन सीमेवर गेली तीन वर्षे दिसत आहेत, त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात त्यांनी म्हटले आहे, की देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व, प्रादेशिक एकात्मता यांचे रक्षण करण्याकरिता पायाभूत सुविधा क्षमता सज्ज आहेत व लष्करी दलेही सतर्क आहेत. परंतु भारत-चीन सीमेवर उडत्या तबकडय़ांसारख्या वस्तू दिसल्याचे पुरावे नाहीत.
जम्मू- काश्मीरमधील परिस्थितीबाबत विचारले असता ते म्हणाले, की सरकारने तेथे सातत्याने दहशतवादविरोधी मोहिमा राबवल्या आहेत. त्यामुळे तेथील परिस्थिती तुलनेने बरीच स्थिर आहे. काश्मीरमधील स्थलांतरितांच्या पुनर्वसनाबाबत विचारले असता ते म्हणाले, की पंतप्रधानांनी त्यासाठी २००८ मध्ये १६१८.१४ कोटी रुपयांची योजना जाहीर केली आहे. स्थलांतरितांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकार भूमिका पार पाडत आहे. काश्मीरमध्ये २००९ मध्ये सर्वाधिक म्हणजे २४५ दहशतवादी मारले गेले आहेत.