उत्तर भारतात सध्या असलेल्या थंडीच्या लाटसदृश परिस्थितीपासून दिलासा मिळण्याची अद्याप शक्यता दिसत नाही. गुरुवारीदेखील अनेक  ठिकाणी तापमान घसरले, तसेच काही भागांत धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.
उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या अनेक भागांत पाऊस पडल्यानंतर किमान तापमान खाली आले, तर हिमवृष्टी होऊन काश्मीर खोऱ्याला पुन्हा बोचऱ्या थंडीला सामोरे जावे लागले.
राजधानी दिल्लीत सकाळी किमान तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी घटून ५.८ अंश सेल्अिसवर आले. बुधवारी ते ११ अंश सेल्अिस होते. तथापि, दिवसा वातावरणात सुधारणा होऊन कमाल तापमान कालच्या १४.७ अंशांवरून आज १९ अंश सेल्सिअसवर गेले. उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वाईट हवामानामुळे ६१ गाडय़ा उशिरा धावत होत्या, तर ५ गाडय़ा रद्द करण्यात आल्या. दिल्ली विमानतळावरील हवाई वाहतूक मात्र सामान्य होती.
राजस्थानमध्ये दाट धुक्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक सेवा बाधित होण्याची परिस्थिती कायम राहिली. राज्यात अनेक ठिकाणी तापमापकाचा पारा खाली उतरला. माऊंट अबू येथे राज्यातील सगळ्यात कमी, म्हणजे ३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
निरभ्र आकाश आणि थंड बोचरे वारे यामुळे अनेक ठिकाणी पारा १ ते ४ अंशांपर्यंत घसरला. जैसलमेर येथे ६.९ अंश, श्रीगंगानगर येथे ७.४ अंश, तर सिकर येथे ७.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदण्यात आले. राज्याची राजधानी जयपूर सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत दाट धुक्याने वेढली गेली होती आणि तेथील किमान तापमान ७.८ अंश सेल्सिअस होते.