उत्तर कोरियाने मंगळवारी तिसऱयांदा अणुचाचणी केली. ही चाचणी यशस्वी झाल्याचा दावा उत्तर कोरियाने केला आहे. आधीच्या अणुचाचणीपेक्षा जास्त स्फोटक क्षमता असलेल्या उपकरणाचा यावेळी वापर करण्यात आला, असे उत्तर कोरियातील अधिकृत सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
अतिशय सुरक्षितपणे ही अणुचाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वी झाली. अणुचाचणीचा सभोवतालच्या पर्यावरणावर कोणताही प्रतिकूल परिणाम झालेला नाही, असेही या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
उत्तर कोरियाने अणुचाचणी घेतल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यापूर्वीच त्याबद्दल इतर देशांकडून शक्यता वर्तविण्यात आली होती. चीनमधील भूकंपमापक यंत्रणेने उत्तर कोरियामध्ये स्फोट घडवून आणल्याचे म्हटले होते. दक्षिण कोरियानेही उत्तर कोरियातील स्फोट ही अणुचाचणीच असल्याचे ठामपणे म्हटले होते. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते किम मिन-सेओक यांनी पत्रकारांना सांगितले की, उत्तर कोरियाने २००६ आणि २००९मध्ये घेतलेल्या अणुचाचण्यांपेक्षा मंगळवारी घेतलेल्या चाचणीची क्षमता निश्चितच जास्त आहे.
दरम्यान, अणुचाचणी सद्यस्थितीत न टाळता येण्यासारखी असल्याचे उत्तर कोरियाने अगोदरच चीन आणि अमेरिकेला कळविले होते.