उत्तर कोरियाने अतिशय अचूक असलेल्या ‘इंटेलिजंट रॉकेट’ची चाचणी यशस्वीरीत्या घेतली असून ते नौदलात तैनात केले जाणार आहे. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात उत्तर कोरियाने मोठी प्रगती केली असल्याचेच हे चिन्ह आहे. कोरियाच्या सेंट्रल न्यूज एजन्सी या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या उपस्थितीत पूर्व समुद्रात ही चाचणी घेण्यात आली.

जहाजाचा अचूक वेध घेणारे हे रॉकेट (अग्निबाण) एका बोटीवरून उडवण्यात आले होते. या रॉकेटने सुरक्षित उड्डाण करून जहाजाचा अचूक वेध घेतला. या चाचणीचे स्थळ व तारीख सांगण्यात आलेली नाही. नवीन जहाजविरोधी अग्निबाणाची तैनाती उत्तर कोरियाच्या नौदलाने खूपच आधी केली आहे. या रॉकेटची निर्मिती अचूक झाली असून आणखी अचूक व इंटेलिजंट व दिशादर्शित शस्त्रास्त्रांची निर्मिती केली जाईल असे किम जोंग यांनी सांगितले. उत्तर कोरिया हा अण्वस्त्रे धारण करणारा कम्युनिस्ट देश असून त्यांनी नवीन आंतरखंडीय क्षेपणास्त्रे व रॉकेट तयार केली आहेत. संयुक्त राष्ट्रांनी उत्तर कोरियातील मानवी हक्क उल्लंघनाच्या विरोधात ठराव संमत केल्यानंतर त्याला त्या देशाने विरोध केला आहे. किम जोंग यांच्या मृत्यूचे दृश्य असलेला चित्रपट प्रदर्शित केल्याने त्यांनी अमेरिकी चित्रपट कंपनीवर सायबर हल्ला केला होता. दक्षिण कोरिया व अमेरिका या देशातील तज्ज्ञांच्या मते अमेरिकेला शह देऊ शकतील अशी क्षेपणास्त्रे विकसित करण्याचा उत्तर कोरियाचा इरादा आहे.
क्षेपणास्त्रांवर बॉम्ब ठेवता येतील असे तंत्रज्ञान उत्तर कोरियाने विकसित केल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. उत्तर कोरिया सागराधिष्ठित क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करीत आहे त्यामुळे त्यांना अण्वस्त्रहल्ला झाल्यास त्याला तोंड देण्याची क्षमता प्राप्त होईल.