तुमचा वाफाळता कॉफीचा मग व थंड बिअरचा ग्लास तुमच्या मोबाईलचे चार्जिग करू शकतो. त्यासाठीचे एक यंत्र अमेरिकी कंपनीने विकसित केले आहे.
कंपनीने असा दावा केला आहे की, एपिफॅनी असे या यंत्राचे नाव असून त्याच्या मदतीने गरम कॉफीतली ऊर्जा व थंडगार पेयातील ऊर्जा यांचा वापर मोबाईल फोनच्या चार्जिगसाठी करता येईल. वजनाने अत्यंत हलके असलेले हे यंत्र तुम्ही तुमच्या पिशवीत सहज ठेवू शकता. या यंत्रात स्टरलिंग इंजिन वापरलेले असून ते ऊर्जेतील असमानतेच्या तत्त्वावर चालते. त्यातून निर्माण झालेली वीज ही तुमचा मोबाईल चार्ज करण्यासाठी वापरता येते असे गिझमॅगने म्हटले आहे.
स्टरलिंग इंजिन हे १८१६ मध्ये स्टीम इंजिनला स्पर्धा म्हणून शोधण्यात आले होते, पण त्याचा वापर हा बराच काळ कमी ऊर्जेच्या उपयोजनांपुरता सीमित होता. एपिफॅनी लॅबोरेटरीजने आधुनिक साधनांचा वापर करून हे तंत्र आणखी वेगळ्या प्रकारे वापरले, तसेच त्याचा आकारही खूप लहान करण्यात यश आले. या यंत्राला दोन बाजू असतात; त्यातील निळी बाजू शीतपेयांपासून ऊर्जा मिळवण्यासाठी तर लाल बाजू ही गरम पेयातून ऊर्जा मिळवण्यासाठी वापरली जाते. या यंत्राच्या निर्मात्यांच्या मते उष्ण पेयांपासून जास्त ऊर्जा निर्मिती होते. त्यात यूएसबी पोर्ट असून त्याच्या मदतीने एक हजार मिलीअँपीयर किंवा त्यापेक्षा कमी चार्जिग करता येते. याचा अर्थ त्याचा वापर आयफोन अँड्रॉइड, आयपॉड व इतर यूएसबी डिव्हाइसेसच्या चार्जिगसाठी करता येतो. एपिफॅनी लॅबोरेटरीने असा दावा केला की, आपण थेट विजेच्या उपकरणांच्या मदतीने चार्जिग करतो त्याच वेगाने या यंत्राने चार्जिग करता येते. त्याच्या व्यावसायिक उत्पादनासाठी निधी मिळवण्यासाठी एपिफॅनी लॅबोरेटरी प्रयत्नशील आहे.