देशाची आर्थिक घडी बसवण्यासाठी तसेच आर्थिक उभारीसाठी आपण काही तडजोडींसह नवीन कल्पना स्वीकारण्यास तयार असून आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणाऱ्यांकडून अधिक कर प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी गुरुवारी दिली. अध्यक्षपदाची निवडणूक दुसऱ्यांदा जिंकल्यानंतर प्रथमच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ओबामा यांनी आर्थिक उभारणीबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आपले मत व्यक्त केले. देशासमोर असणाऱ्या आर्थिक आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्यात येणार असून १ जानेवारीर्प्यत याबाबतचा ठोस निर्णय घेण्याबाबत आपण तयार असल्याचे ओबामा यांनी सांगितले. नव्या नोकऱ्या निर्माण करणे, करप्रणाली तसेच तूट भरून काढण्याबाबतचे मोठे निर्णय घेण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन कल्पना तसेच शक्य तेवढय़ा तडजोडींसाठी आपण तयार असल्याचेही ओबामा यांनी सांगितले.