सामान्यांच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते स्वत:च शुद्धीत नसतील तर ते सामान्यांचा काय सांभाळ करणार. गणवेषाचा अपमान होईल असे वर्तन सार्वजनिक ठिकाणी करणारा मद्यधुंद अवस्थेत झिंगणारा पोलीस पाहिल्यावर आपल्या सुरक्षेबाबत जनमानसात शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु आजच्या सोशल मीडियाच्या युगात असे गैरवर्तन करणारे चेहरे लपून राहत नाहीत. अशाच एका गणवेषधारी पोलिसाचा झिंगतानाचा दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अमित ठाकुर नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला आहे. स्वत:च्या पायावर उभा राहण्यास असमर्थ असलेला हा पोलीस चक्क खाली कोसळतो.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या व्हिडिओची दखल घेत आपल्या टि्वटर खात्यावर टि्वट केला आहे. व्हिडिओच्या सत्यतेबाबत अधिक खुलासा झाला नसला तरी या आधीदेखील दिल्ली मेट्रोमधील अशाच प्रकारचे अन्य व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ज्यात एका व्यक्तीने मेट्रोमध्येच लघुशंका उरकल्याच्या व्हिडिओचा समावेश आहे.