योगगुरू रामदेव बाबा यांच्या हरिद्वारमधील पतांजली आश्रमातील हाणामारीत एकचा मृत्यू झाल्याप्रकरणी रामदेव बाबा यांचा भाऊ राम भरत यांना अटक करण्यात आली आहे.
रामदेव बाबा यांच्या हरिद्वार येथील पतंजली हर्बल फूड पार्क येथे बुधवारी पार्कचे सुरक्षा रक्षक व स्थानिक वाहतूकदारांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत दलजित सिंह या एका वाहतूकदाराचा मृत्यू झाला. हरिद्वारच्या पोलीस अधिक्षक स्वीटी अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाणामारी आणि एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्यांमध्ये रामदेव बाबा यांचे बंधू राम भरत यांचाही समावेश असल्याचे त्या म्हणाल्या. हाणामारीत मृत्यू झालेल्या दलजित सिंह यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर तपासाला दिशा मिळेल. तोपर्यंत काहीच सांगता येणार नाही, असेही त्या पुढे म्हणाल्या.
पोलीसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हर्बल पार्कमधील सामानाच्या वाहतुकीचे कंत्राट स्थानिक वाहतूकदारांना द्यावे अशी मागणी स्थानिक वाहतूक संघटनेने केली होती. तर पतंजली व्यवस्थापनाने स्वस्त दरात वाहतूक सेवा देणाऱयांनाच कंत्राट देऊ अशी भूमिका घेतली होती. यावरुन पतंजली प्रशासन व वाहतूकदार यांच्यात वाद सुरु होता. पतंजलीच्या प्रशासनात सक्रीय असलेले रामदेव बाबा यांचे बंधू राम भरत हेदेखील वाहतूकदारांसोबत चर्चा करण्यासाठी आले होते. काही वेळाने वाद चिघळल्याने पतंजलीचे कर्मचारी व वाहतूकदारांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीदरम्यान दलजित सिंह या चालकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.