पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पंधरा महिन्यांच्या काळात उद्योगांना अनुकूल वातावरण तयार करण्याच्या प्रयत्नात लक्षणीय प्रगती केली आहे, असे असले तरी परदेशी कंपन्यांसाठी भारतातील नोकरशाहीचा लालफितीचा कारभार हा अजूनही त्यात अडचण ठरत आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.भारतात सध्या एकीकडे लालफितीचा कारभार व दुसरीकडे गुंतवणूकदारांना पायघडय़ा असे एकाच वेळी चालले आहे काय, असा प्रश्न विचारला असता राष्ट्रीय सुरक्षा मंडळाच्या दक्षिण आशिया विभाग कामकाजाचे संचालक पीटर. आर.लॅव्हॉय यांनी सांगितले, की गुंतवणूकदारांसाठी पायघडय़ा घालण्याच्या तुलनेत अजूनही लालफितीचा कारभार हाच अडथळा जास्त आहे असे म्हणता येते.भारतातील आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारने विविध प्रश्नांमध्ये इतकी पटकन प्रगती केलेली नाही एवढी प्रगती मोदी सरकारने कमी काळात करून दाखवली आहे. भारताची लोकशाही जागतिक कीर्तीची आहे त्यांची काही मानके आहेत व त्याला तुलना नाही.भारत सरकारचा दृष्टिकोन काय आहे, हे नोकरशाहीला समजले आहे. मे २०१४ नंतर भारत व अमेरिका यांच्या संबंधातील बदल सकारात्मक आहेत आतापर्यंतचे सर्वात दृढ संबंध या दोन देशात आहे. मोदी व त्यांचे मंत्रिमंडळ भवितव्याकडे पाहत आहे व ते उज्ज्वल आहे, असेच वाटते.मोदी यांच्या सरकारने परदेशांशी संपर्क वाढवला आहे, भारत व इतर शेजारी देशांतील सीमावाद कायम आहेत, भारताने बांगलादेश बरोबरचा वाद सोडवला आहे, ती सकारात्मक घटना होती पण चीनबरोबरचा सीमा प्रश्न सुटलेला नाही.पाकिस्तानबरोबर अजूनही तणावाचे वातावरण आहे. एकूणच वातावरण पाहिले तर काही बाबी सकारात्मक आहेत पण काही आव्हाने अजूनही आहेत त्यांच्यावर मात करावी लागेल.